धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये आंदोलन सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांचा मोर्चा..
नाशिक प्रतिनिधी आविनाश पिंगळे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सोमवारी नाशिकमध्ये विविध विद्यार्थी संघटना सामाजिक संस्था आणि समविचारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली. घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला असून काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. या आंदोलनात विद्यार्थी विद्यार्थिनी आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्येही विविध संघटनांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला. आंदोलकांनी केंद्र सरकारवर टीका करत, आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर कठोर भूमिका घेणे लोकशाहीला बाधक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी आंदोलकांनी नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकारांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान झाल्याचा दावा करत त्याची नैतिक जबाबदारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वीकारावी अशी मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणात केंद्र सरकारने कठोर कारवाई न केल्याबद्दलही संताप व्यक्त करण्यात आला.
हलगी आणि डफच्या तालावर घोषणाबाजी करत आंदोलकांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार परीक्षांमधील अनियमितता आणि शिक्षणाच्या वाढत्या व्यापारीकरणाविरोधात आवाज उठवला. एक देश-एक परीक्षा ही संकल्पना वारंवार समोर आलेल्या परीक्षेतील घोटाळ्यांमुळे प्रभावी ठरली नसल्याचा आरोप करण्यात आला.राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा केंद्रीकृत न ठेवता राज्य सरकारांना स्वतंत्रपणे घेण्याचा अधिकार द्यावा अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत केवळ प्रवेश परीक्षेवर अवलंबून राहण्याऐवजी शैक्षणिक गुणवत्तेलाही महत्त्व द्यावे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा फेरविचार करावा आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा विविध मागण्या आंदोलकांनी मांडल्या.
मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे विद्यार्थी नोकरदार आणि नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गांचा वापर केला. या आंदोलनात विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.दिल्लीतील आंदोलनानंतर देशभर उमटणाऱ्या प्रतिक्रिया आणि निषेधाचा एक भाग म्हणून नाशिकमधील हे आंदोलन पार पडले.

टिप्पणी पोस्ट करा