अण्णा हजारेंचा थेट केंद्र सरकारला इशारा माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात राळेगणसिद्धीत मंथन मात्र बैठक निष्फळ अण्णा हजारे आंदोलनावर ठाम..
विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर : राळेगणसिद्धी केंद्र सरकारने माहिती अधिकार कायद्यात केलेल्या मनमानी दुरुस्त्या आणि त्यामुळे या जनहिताच्या कायद्याची कमकुवत होत चाललेली पकड याविरोधात आता राळेगणसिद्धीतून एल्गार पुकारण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत आज राळेगणसिद्धी येथे माहिती अधिकार क्षेत्रातील प्रमुख अधिकारी आणि तज्ज्ञांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.या मंथनानंतर अण्णा हजारे यांनी सरकारला थेट शब्दांत इशारा दिला आहे.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्याच्या बैठकीत सरकारकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.या कायद्याचा आत्मा जिवंत ठेवायचा असेल तर तातडीने एक नवी कमिटी नेमणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कमिटीत माहिती अधिकार कायद्याचा सखोल अभ्यास असणारे आणि जनतेच्या बाजूने विचार करणारे अधिकारी असायला हवेत असे अण्णांनी ठामपणे सांगितले.
तर ५ जुलैपासून आंदोलनाचा भडका.!
माहिती अधिकार कायद्याची गळचेपी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही असा सज्जड दम अण्णांनी दिला आहे. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अण्णा हजारे यांनी सरकारला ५ जुलै २०२६ पर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत जर सरकारने सकारात्मक पावले उचलली नाहीत तर पुन्हा एकदा देशव्यापी जन आंदोलन छेडण्याचा आक्रमक इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. या बैठकीत जी चर्चा झाली त्याबाबत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असून पुढील निर्णय अण्णा हजारे आणि मुख्यमंत्री फडणवीस घेणार असल्याची माहिती मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी सांगितल.

टिप्पणी पोस्ट करा